Home Breaking News राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड

राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड

स्वस्त धान्य मिळण्यासाठी शासनाचा निर्णय
बुलडाणा
…………………….
एकत्र कुटुंबातील शिधापत्रिकेत नावे असूनही दिव्यांगबांधव स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहात असल्याची बाब निदर्शनास आल्याने शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने त्यांच्यावरील अन्याय दूर करत दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यभरातील लाखो दिव्यांग व्यक्तींना आता स्वतंत्र शिधापत्रिका दिली जाणार आहे. त्यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाकडे दिव्यांगांना अर्ज करावा लागणार आहे. नुकतेच यासंदर्भातील आदेश प्रत्येक जिल्ह्यांमध्ये धडकले आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ नुसार ग्रामीण भागात ४ कोटी ६९ लाख ७१ हजार म्हणजेच ७६.३२ टक्के लाभार्थीसंख्या आहे. तसेच शहरी भागात २ कोटी ३० लाख ४५ हजार (४५.३४ टक्के)अशी एकूण ७ कोटी १६ हजार शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. या निर्धारित केलेल्या पात्र संख्येनुसार लाभार्थ्यांची अंत्योदय गट व प्राधान्य गटात गटांत विभागणी करण्यात आली आहे. या सर्वांना ठरविलेल्या धोरणानुसार स्वस्त धान्य देण्यात येते. त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसारच दिव्यांग व्यक्तींनाही स्वतंत्र शिधापत्रिकेवर स्वस्त धान्य दिल्या जाणार आहे.
एकत्र कुटुंबात राहात असलेल्या दिव्यांगांची नावे रेशनकार्डमध्ये आहेत. मात्र, पात्र असतानादेखील ते अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहात होते. काही कुटुंबप्रमुख नोकरीत असल्याने त्यांच्या घरातील दिव्यांग सदस्य स्वस्त धान्याच्या लाभास पात्र ठरत नव्हते. यासह अन्य काही अडचणींमुळे ते वंचित राहात होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या दिव्यांगांना स्वतंत्र रेशनकार्ड देऊन अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राज्यभरातून रेटून धरण्यात आली होती. अखेर शासनाने दखल घेत त्यांना स्वतंत्र रेशनकार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
स्वतंत्र शिधापत्रिकेची मागणी करणाऱ्या दिव्यांगबांधवांनी संबंधित तालुक्यांच्या तहसीलमधील शिधावाटप कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार शिधापत्रिका देऊन दिव्यांगांना तत्काळ स्वस्त धान्य देण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी महेश कानडे यांनी दिले आहेत.जिल्ह्यात ७३ हजार ३६८ दिव्यांगांची नोंद
समाज कल्याण विभागाकडे जिल्ह्यातील ७३ हजार ३६८ दिव्यांगबांधवांची नोंद आहे. स्वतंत्र शिधापत्रिका आणि स्वस्त धान्य मिळण्यासाठी दिव्यांगांनी शिधावाटप कार्यालयाकडे अर्ज करून स्वतंत्र रेशनकार्ड मिळवून घ्यावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक उपायुक्त मनोज मेरत यांनी केले.

शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील तहसीलदारांना पत्र दिले आहे. निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना जसे लाभ मिळतात, त्याच दरात दिव्यांगांना धान्य मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी अर्ज करावेत.
गणेश बेल्लोळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here