Home Breaking News बुलडाणा जिल्ह्यात इथे साकारले जागतिक दर्जाचे ‘गांधीं शिल्प’

बुलडाणा जिल्ह्यात इथे साकारले जागतिक दर्जाचे ‘गांधीं शिल्प’

सालईबन : गांधीजींच्या विचारांनी घेतलेले मूर्त रूप

महात्मा गांधीजींची आठवण यंदा केवळ त्यांची १५०वी जयंती आहे, म्हणूनच आपण करतो आहोत, असे नाही. विशेषतः २१ वे शतक सुरू झाल्यावर संपूर्ण जगभरात गांधीजींचे नाव नव्याने घेतले जाऊ लागले. अनेक संस्थांनी, माध्यमांनी २०व्या शतकातील महान व्यक्ती म्हणून त्यांचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित केले. ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्म समभाव, एक नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मते आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते. त्यांच्याच ह्या सर्वोदयी विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य तरुणाई फाउंडेशन
खामगाव च्या माध्यमातून महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या जमिनीवर सातपुडा डोंगर रांगात वसलेल्या “सालईबन” येथे सुरु आहे. पर्यावरण सरंक्षणाला केंद्रस्थानी ठेवत पूरक उपक्रम राबविल्या जात आहे, त्याचाच हा आढावा.

जिल्हा बुलडाणा, जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा हे एक छोटंसं खेडेगाव, त्याला शांती नगर असेही म्हटल्या जाते. या गावापासून २ किमी अतंरावर सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी महात्मा गांधी लोकसेवा संघाची जमिन आहे. कलाचार्य पंधे गुरुजी सह अनेक ज्येष्ठ सर्वोदयींच्या पुढाकारातून अनेक वर्षांपूर्वी इथं चळवळीचे केंद्र सुरु झाले होते. काळाच्या ओघात मध्यंतरी काही वर्षे गोरक्षण वगळता इतर कार्य स्थगित झाले. येथे पुन्हा तरुणाई फाउंडेशन खामगाव च्या माध्यमातून सेवा कार्य उभे राहत आहे.

२५ हजार वृक्षारोपण आणि संवर्धन

महात्मा गांधीच्या जीवन काळादरम्यान पर्यावरण संरक्षण हा काही मोठा प्रश्न नव्हता. तरीही पर्यावरण आणि विकासाबाबत त्यांची मते स्पष्ट होती. निसर्गाला विनाशापासून वाचवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे गांधीजींच्या विचारामध्येच सामावलेले होते. गांधीजींचे विकासाचे आणि निसर्ग संरक्षणाबाबतचे विचार शाश्वततेच्या संकल्पनेवर आधारित होते. हा विचार केंद्रस्थानी ठेवत या ठिकाणी छोट्या स्वरूपात वृक्षारोपणाला सुरुवात केल्या गेली. हळू हळू या कार्याला वेग आला यात लोकसहभागासोबत शासनानेहि पुढाकार घेतला. सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या सहकार्याने आज रोजी २५ हजार झाडे येथे लावल्या आणि जगवल्या गेली. सातपुड्याच्या जंगलातून नामशेष होत असलेल्या सालई, पळस, मोह, अंजन, खैर, बेहडा, कडुनिंब सह अनेक वृक्ष येथे डोलत आहेत.

वनौषधी उद्यान
इथे एक वनौषधी उद्यान बनविण्यात आले यात अनेक दुर्मिळ असलेले कंदमुळे, वेली लावल्या आहेत. वृक्षारोपण आणि संवर्धनाचे हे कार्य एवढे प्रभावीपणे होत आहे कि याची राज्यस्तरावर महती गेली आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या जमिनीलगत शासनाने मागील वर्षी ७५ हजार झाडांची लागवड केली. सालई बनातील वृक्षारोपणाचा सर्वात मोठा बदल येथील जैव विविधतेवर झाला. उजाड आणि विराण पडलेल्या जागेवर मोठी हिरवळ झाल्याने जीव सृष्टी येथे सृजन करू लागली. सुमारे ५० प्रकारच्या पक्ष्यांसह फुलपाखरे, सरीसृप व काही प्रमाणात वन्यजीव येथे मुक्तपणे बागडत आहेत. येणाऱ्या काही वर्षात येथे जिल्ह्यातील सर्वात मोठे मानवनिर्मित जंगल दिसू लागेल. हे सर्व काम श्रमदानातून करत असतानाच पर्यावरणाचा कृतियुक्त विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी इथे राज्यस्तरिय जैव विविधता प्रशिक्षण निवासी शिबीर घेण्यात आले. राज्यभरातून आलेल्या युवक युवतीनी सातपुड्यातील जैव व वनसंपदेचे निरीक्षण, अभ्यास केला. काही उपक्रम राबविले. वर्षभर इथे भेटी देणाऱ्या व्यक्तीच्या हातून झाडे लावल्या जातात. वाढदिवसही वृक्षारोपणाने व वृक्षदानाने साजरे होतात.

विषमुक्त सेंद्रिय शेती

पर्यावरण रक्षणाचाच एक महत्वाचा एक भाग म्हणजे सेंद्रिय शेती. जमिनीच्या काही भागात विषमुक्त शेतीचा प्रयोग करण्यात येत आहे. त्यात धान्यासोबतच भाजीपाला पिकविला जातो. पिकांवर कोणतेही रासायनिक औषधी न फवारता तसेच कोणतेही रासायनिक खत टाकता पिके काढल्या जातात. घातक असलेल्या किडीपासून रक्षणासाठी दशपर्णी अर्क. निंबोळी अर्क तसेच शेणखत, कम्पोस्ट खताचा वापर केल्या जातो. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी अंमलात आणावा यासाठी शिवारफेरीचे आयोजन केल्या जाते. गांधीजींच्या आश्रमात स्वतःसाठी लागणारे अन्न स्वतः पिकवल्या जात होते. पृथ्वी आपल्या प्रत्येकाची गरज भागवू शकते, पण कोणा एकाची हाव नाही असं गांधीजी म्हणत तोच विचार धागा कायम ठेवत इथे गरजेपुरतेच अन्नधान्य पिकवल्या जाते.

आदिवासी बांधवांचा विकास व संस्कृतीचे जतन

सातपुडा परिसरात अनेक आदिवासी पाडे आहेत. संस्थेच्या जमिनीवर वसलेल्या वडपाणी आणि लगतच असलेल्या बांडापिंपळ येथील आदिवासी बांधवांचा जीवनस्तर उंचावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविल्या गेले आहेत. वडपाणी या वस्तीसाठी पूर्वी रस्ता नव्हता, शेताच्या बांधावरून किंवा जंगलातील नाल्यातून त्यांची वहिवाट होती. येथील आबाल वृद्धांना सोबत घेऊन श्रमदानातून एक रस्ता बनविल्या गेला. त्यामुळे वाहने त्यांच्या घरापर्यंत पोहचू लागली आहेत. पूर्वी आपत्काळात रुग्णवाहिका वस्तीपासून २ किमी अंतरापर्यंतच जात होती ती सुद्धा दारासमोर येऊ लागली आहे. या रस्त्यामुळे आरोग्य सुविधा, शेतमालाची ने आण या सारख्या कामासाठी मोठा फायदा झाला.
पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवरून पाणी भरावे लागण्याचे कष्ट कमी व्हावे म्हणून बोअरवेल द्वारे पाणी पुरवण्यात येते. त्यासाठी वस्तीपर्यंत
पाइपलाईन टाकण्यात आली आहे. यासह एक सार्वजनिक वापरासाठी पाण्याच्या टाक्या, गुरांसाठी मोठा हौद बांधण्यात आला आहे.
तिसरी महत्वाची गरज होती ती विजेची. ती सुद्धा पूर्णत्वास गेली. संस्थेच्या पाठपुराव्यामुळे या वस्तीसाठी सिंगल फेज वीज उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वी सौर दिवे सुद्धा इथे लावण्यात आले होते. वीज उपलब्ध झाल्याने आदिवासींच्या घरामध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच प्रकाश पडला.
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी साठी रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधा संस्थेच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या.
या सुविधांसोबत सर्वात महत्वाचे म्हणजे आदिवासीं बांधवांचे आरोग्य सुधारावे या हेतूने गेल्या ५ वर्षात सातत्याने आरोग्य शिबिरे घेतल्या जात आहेत. या शिवाय आकस्मिक घटना, अपघात, गंभीर समस्या साठी आदिवासी बांधवाना जळगाव जा. खामगाव, अकोला, नागपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. या शिवाय प्रकल्पाला भेटी देणाऱ्या डॉक्टर मंडळींकडून वेळोवेळी आदिवासी बांधवाना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात.

आदिवासी संस्कृतीचे जतन

करण्यासाठी दरवर्षी होळी सणाच्या दरम्यान येथे फगवा उत्सवाचे आयोजन केल्या जाते. त्यात सातपुड्यातील दूरपर्यंत पसरलेल्या आदिवासी वस्तीतील बांधव सहभागी होतात. या निमित्ताने पारंपरिक वाद्य, वेशभूषा, लोकगीत, लोकसंगीत याचा सुंदर संगम घडून येतो. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील अनेक लोक उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहित करतात. आदिवासी संस्कृतीमधील बोली भाषा नवीन पिढीला माहित व्हावी या उद्देशाने चित्रमय शब्दकोष निर्मितीचे काम पूर्णत्वास जात आहे. पावरा, निहाल, भिलाला सारख्या आदिवासी जमातींच्या मुलांसाठी हा ज्ञानकोष महत्वाचा ठरणार आहे.
फगवा उत्सवातच पुरक म्हणून पोषण आहार, रानभाजी ओळख, क्रीडा प्रदर्शन, अन्नदान, कपडे वाटप, औषधी वाटप असे उपक्रम राबविल्या जातात.

गौरक्षण
संस्थेच्या वतीने गत २५ वर्षांपासून गौरक्षण चालविल्या जात आहे. आज घडीला 30 च्या वर गोवंशाचे इथे जतन करण्यात येते. त्यांना सकस चारा देणे, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण केल्या जाते. वारा पावसापासून संरक्षणासाठी टिन शेड उभारलेले आहे. गोवंशाच्या शेणखताचा वापर जमिन सुपिक करण्यासाठी केल्या जातो. येणाऱ्या काळात सशक्त गोवंशांमध्ये अधिक वाढ करून दूध दुभते आदिवासी बालकांना पौष्टिक आहार म्हणून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

बालकांसाठी व युवांसाठी श्रमसंस्कार शिबिरे

महात्माजींनी शरीरश्रमाला रोजच्या जीवनात अत्यावश्यक स्थान दिले होते. फक्त विचारांचा प्रसार व प्रचार एवढेच न करता त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देत या ठिकाणी गेल्या पाच वर्षात श्रमसंस्कार शिबिरे घेण्यात आली. बालकांसाठी, युवा युवतींसाठी होणाऱ्या शिबिरात गांधीजींचे जीवन प्रत्यक्ष जगण्याचे धडे शिबिरार्थींना देण्यात येतात. पहाटे लवकर उठणे, वैयक्तिक स्वच्छता, सकाळ संध्याकाळ प्रार्थना, ३ तास नियमित श्रमदान, निसर्ग वाचन, जंगल भ्रमण, सार्वजनिक स्वछता, आरोग्य, स्वतःसाठीची सर्व कामे स्वतः करणे अशा कृतींतून संस्कार दिले जातात. यातून थोडा वेळ काढत स्वदेशी, सर्वधर्म समभाव, पर्यावरण विचार आदींवर प्रबोधन केल्या जाते. अशाच शिबिरांच्या माध्यमातून सालई बनात वृक्षारोपण, जल संवर्धनाचे मोठे काम उभे राहिले आहे.

शाश्वत जीवन शैलीचा अंगीकार

हे सर्व कार्य सुरु होताच खामगाव शहरातून मंजितसिंग शीख हे एकटेच ५ वर्षांपूर्वी या ठिकाणी कायमस्वरूपी राहायला आले. तर यावर्षी २०२० मध्ये उमाकांत कांडेकर हे सहपरिवार इथे स्थलांतरित झाले. निसर्गपूरक शाश्वत जीवन शैलीचा स्विकार या सर्वानी केला आहे.
गांधीजींनी खेडयाकडे चला हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून हे जगत आहेत. इथे श्रमदानासाठी येणारे कार्यकर्तेही काही दिवस इथे मुक्काम करून याच पद्धतीने जीवन व्यतीत करतात. येणाऱ्या काळात यापासून प्रेरित होऊन काहींनी इथे कायमस्वरूपी राहण्याचा संकल्प केला आहे.

शांती स्थल : जागतिक दर्जाचे गांधींचे शिल्प

गांधीजींचे दीडशेव्या जयंतीचे वर्ष संपत असतांनाच विनोबाजींचे सव्वाशेवी जयंती वर्ष सुरु होत आहे. यानिमित्ताने सालई बनातील एक महत्वाची घडामोड नमूद करावीशी वाटते. केंद्र सरकारने बापूंना श्रद्धांजली म्हणून या वर्षात काही उपक्रम राबविण्याचे आवाहन जनतेला केले. त्याला प्रतिसाद म्हणून येथे महात्माजींचे जागतिक दर्जाचे अनोखे शिल्प उभारल्या गेले. तरुणाई फाउंडेशन चे सचिव राजेंद्र कोल्हे यांच्या संकल्पनेतून शिल्पाची निर्मिती झाली आहे. सुमारे २५ फूट उंचीचे हे पोलाद पट्ट्यांपासून तयार केल्या गेले आहे. एका विशिष्ट अंतरावरून आणि विशिष्ट कोनातून पहिले असता बापूंची हसरी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. पाहण्याची जागा एक फूट सुद्धा बदलली तरी प्रतिमा विचलित होते. दृष्टी भ्रमावर आधारित या कलेला
एनामॉर्फिक स्कल्प्चर किंवा इल्युजन आर्ट असे संबोधतात. महात्माजींचे जगभरात अनेक शिल्प आहेत मात्र अशा पद्धतीचे एक जगातील पहिले शिल्प आहे. कुतूहलापोटी हे शिल्प पाहण्यासाठी राज्यातील अनेक लोकांनी आतापर्यंत इथे भेटी दिल्या आहेत. या ठिकाणाला “शांती स्थळ” असे नामकरण करण्यात आले आहे. विनोबाजींचे स्मरण म्हणून अश्याच धर्तीवर कलात्मक शिल्प निर्मिती होऊ शकते. यासाठी योगदानाची आवश्यकता पूर्ण झाली तर त्याचे कार्य हाती घेतल्या जाईल. केवळ प्रतिमा निर्मिती हा सीमित उद्देश्य न ठेवता त्या माध्यमातून त्यांचे विचार समाजात जायला हवे हा हेतू आहे. गांधी विनोबांच्या साहित्यासाठीही एक वाचनकेंद्र या निमित्ताने सुरु करण्यात येईल.

ज्येष्ठ सर्वोदयींचें मार्गदर्शन

या सर्व कृतियुक्त कार्यक्रमांसाठी महात्मा गांधी लोकसेवा संघाचे अध्यक्ष जयवंत मठकर, शंकर बगाडे, शिवचरण ठाकूर, बाळासाहेब लबडे, सुगन बरंठ, ठाकुर, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे सचिव सुधाकर अजबे, रमेश दाणे या सर्वांचे मार्गदर्शन घेत अनेक गांधी विचारांचे युवा कार्यकर्ते या कार्यासाठी प्रत्यक्ष झटत आहेत. सुनगाव ग्रामपंचायत चा सहयोग सर्व कार्यासाठी खूप मोलाचा ठरत आहे. लोकप्रतिनिधींचे सहकार्य उल्लेखनीय आहे. खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ.संजय कुटे यांच्या निधीतून शिबीरार्थीसाठी इथे सभागृहाचे निर्माण झाले आहे.

बापूंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली

येणाऱ्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणाचे प्रश्न आणखी गंभीर स्वरूप धारण करणार आहेत, त्याची फक्त चिंता करून, सरकार किंवा व्यवस्थेला दोष देऊन ते सुटणार नाहीत त्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने जबाबदारी स्वीकारायला हवी. हाच विचार घेऊन पर्यावरणावर कृतियुक्त उत्तर शोधण्याचे कार्य सुरु आहे. सातपुड्यातील आदिवासींचे, शेतकऱ्यांचे व पर्यावरणाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी “सालईबन” हा प्रकल्प लोकसहभागातून उभा होत आहे. भविष्याच्या दृष्टीने निसर्गोपचार केंद्र, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, देशसेवेत जाणाऱ्या युवांसाठी अध्ययन व क्रीडा केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी समाजातून सहकार्याची, निधीची गरज आहे. परंतु केवळ निधीमुळे हे कार्य थांबणार नाही यथायोग्य वेळी लोकसहभाग मिळत राहतोच याची अनुभूती सालईबन प्रकल्पाच्या निमित्ताने आली आहे. केवळ ५ वर्षात उभे राहिलेलं कार्य हे पैश्याच्या रूपात मोजले तर लाखोंच्या घरात जाते. त्यात रस्ते, पक्के सभागृह, जागतिक दर्जाचे शांतीशिल्प, विंधन विहिरी, टिन शेड, निवासी कुटी, वीज व्यवस्था, सौर दिवे, ठिबक सिंचन, पाणी पुरवठा, सार्वजनिक वापरासाठी साहित्य अशा ठोस कामाचा समावेश आहे.
गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आश्वासक वाटचाल त्यांच्याच सर्वोदयी विचारावर, त्यांच्याच नावाने महात्मा गांधी लोकसेवा संघांकडून होत आहे. हे कार्य म्हणजे बापूंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित केल्यासारखे आहे. –
शब्दांकन :
उमाकांत कांडेकर
“सालईबन”, सातपुडा
Photo Credit : Gananjay Kandekar GK

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here