Home कृषी परतीच्या पावसाचे थैमान!

परतीच्या पावसाचे थैमान!

पिंपळगाव राजा (वार्ताहर)-:गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बळीराजा आर्थिक,मानसिक त्रास सहन करीत असतांनाच कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या विपरीत परिस्थिती मुळे शेतकरी देशोधडीला लागला असतांना काल सायंकाळी आलेल्या परतीच्या पावसाने व सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरशः बळीराजा ची धांदल उडवून दिल्याने शेतकऱ्यांच्या कपाशी,सोयाबीन,ज्वारी व मका पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.तसेच शेतकऱ्यांनी शेतात कापनी करून गंजी उभी करून ठेवलेल्या तीळ पिकांची वाट लावून टाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे.
        गेली पाच वर्षे निसर्गाच्या कालचक्राने बळीराजा च्या उत्पादनांची बिकट अवस्था करून गेली आहे.मागील वर्षी सुद्धा सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे सततच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले.तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.तर यावर्षी सप्टेंबर महिना संपत असतांनाच पाऊस सातत्याने पडत असल्याने कपाशी पिकांच्या कैऱ्या जागेवरच काळ्या पडल्या असून बोंडे सडली आहेत.तर सोयाबीन पिकाच्या शेंगा ह्या सततच्या पावसाने खराब झाल्या असून ज्वारी पिकांचे मोडतोड होऊन प्रचंड नुकसान झाले असल्याने ज्वारी सध्या स्थितीत बऱ्यापैकी चांगले असून हा पाऊस असाच राहिल्यास ज्वारी ही काळी पडणार असल्याचे विदारक चित्र स्पष्ट पणे दिसत आहे.तर इतर पिकांची सुद्धा वाईट अवस्था झाली आहे.
        सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले असून देशोधडीला लावले आहे.त्यामुळे गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या यशस्वी जीवनाचे कोडे अद्यापही सुटत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वच जण त्रस्त असतांना आता शेतकऱ्यांना निसर्गाने सुद्धा सोडले नसल्याने येणारे दिवस कसे जातील या विवंचनेत बळीराजा सापडला असून शासनाने या कडे लक्ष केंद्रित करून मदत देणे गरजेचे झाले आहे.
मी यावर्षी बागायती कपाशी पिकाची लागवड केली होती,मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वच काही हिरावून घेतले आहे.अशातच आता कोरोना आजाराने डोके वर काढल्याने बळीराजा ने जीवन जगावे तरी कसे असे विविध प्रश्न मनाला सतावत असून आम्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे*
– गजाननआप्पा वानखडे
नुकसानग्रस्त शेतकरी
पिंपळगाव राजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here