Home जागर अर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही!

अर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही!

डबक्यात वाकून बघणार; तर चिखलच उडणार !

मीडिया म्हणजे फक्त टीव्ही नव्हे. प्रिंट, डिजिटल, टीव्ही अशांना एकत्रित मीडिया म्हणणं जास्त योग्य आहे.

वाचन कमी, आकलनाची तयारी नाही, टीव्हीतली बटबटीत चॅनेल निवडून त्यातल्या महाबटबटीत बातम्या पाहायच्या आणि ‘काय हा मीडिया…’, म्हणून बोंब ठोकायची, हा रिकामटेकडा नवउद्योग बनून गेलाय.

अर्णब काय फोन करून कानात सांगत नाही, की या माझं चॅनेल मी कर्कश्श किंचाळतो तेव्हा बघाच.

ते बघतो आपण, आपल्या निवडीनं आणि आवडीनुसार.

त्याचवेळी रवीशही ग्रामीण भारतावर, बेरोजगारीवर बोलतच असतो की.

ते पाहायला बोअरिंग वाटतं! कारण, तो प्रश्न विचारतो. ते बोचतात.

अर्णब न्यायनिवाडाच करून टाकतो आणि व्हर्चुअल कोर्टात बदनामीचा रिअल शिक्षाही देऊन टाकतो.

पेपरमध्ये बटबटीतपणा आणि सवंगपणा तुलनेनं अत्यंत सुक्ष्म असतो. पण, ते वाचायचं, त्यावर विचार करायचा आणि डोक्यात चढवून घ्यायचं कधी?

कित्येक पत्रकार महाराष्ट्रातल्या शहरी, ग्रामीण प्रश्नांवर रोज लिहिताहेत. गावोगावी, गल्लोगल्ली फिरून तिथल्या प्रश्नांवर आवाज उठवताहेत. सोल्यूशन्सही शोधताहेत.

सोशल मीडियावर अशी शेकडो लोकं आहेत, जी क्वालिटी कन्टेन्ट तयार करतात. तोही बहुतांशी फुकट. मराठी, हिंदी आणि इंग्रजीत अशा अनेक वेबसाईट आहेत, जिथं रोज डोकं खाजवावं लागेल, अशा स्टोरी असतात.

हा सगळा मिळून मीडिया असतो…त्यात एखादं डबकं असतंच. तिथं कुणीतरी थयथयाट करत असेल, तर शहाणा माणूस घाण अंगावर उडेल म्हणून कडेनं निघून जातो.

समोर उभा राहून वाकून बघून अंगावर चिखल उडवून घेऊन नंतर ‘काय हा चिखल…’, म्हणून त्रागा करत बसत नाही.

आपण डबक्याजवळ उभं राहायचं की नाही, हे लोकांनी ठरवायचं असतं. त्यासाठी आपलं आकलनही वाढवायचंच असतं.

– सम्राट फडणीस यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार..

#नोंद2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here