Home आरोग्य अखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….!

अखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….!

ज्येष्ठ पत्रकार राहुल पहूरकर हे सध्या खामगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. याच सेंटरमध्ये  कोरोना आजाराने होणारे मृत्यू पाहतांना त्यांच्या  मनाला वेदना होत आहेत. कोरोनाची ही करूण कहाणी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात…….

घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी…!

आज मनात खूप अस्वस्थपणा जाणवतोय. आपण माणूस म्हणून खूप हतबल झालोय. तडफडत असलेल्या व्यक्तीचे प्राण जेव्हा आपण वाचवू शकत नाही तेव्हा मन सुंन्न झालेलं असतं. मी ज्या कोविड वार्डात ऍडमिट आहे तिथं बरीच रुग्ण कोविड सोबत युद्ध करत आहेत. प्रत्येक जण ही लढाई लढतोय, पण त्यातील काही जण लढता लढता अपयशी सुद्धा होत आहेत. पण ती जेव्हा अपयशी झाली खूप वाइट वाटलं. कारण काल संपूर्ण दिवस तिची जगण्यासाठी धावपळ मी जवळून बघत होतो.तिचं नाव होतं रंजना सोनोने. रंजनाताई या भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांच्या लहान बंधूच्या पत्नी होत्या. अत्यंत शांत संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून रंजनाताई यांची ओळख झाली.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिचं लक्ष तिच्या मुलांकडे जास्त होत. सारखं त्या मला आवाज देत पत्रकार भाऊ माझा अक्षय आलाय का? त्याला आत बोलवू नका, तुम्ही त्याला खिडकीत बोलवा, असं त्या सांगायच्या मी अक्षयला कॉल करुन बोलवून सुद्धा घेतले होते रंजनाताई ज्या बेडवर होत्या त्यापुढे एक दूर अंतरावर खिडकी होती ती बंद करू नका उघडीच ठेवा त्या खिडकीतून त्या बघत बघत अक्षयची वाट बघत दिवसभर ऑक्सिजन घेत होत्या. एकीकडे मृत्यू सोबत 2 हाथ सुरू असताना सुरवातीला त्या मला म्हणाल्या पत्रकार भाऊ मी विपश्यना केली आहे. त्यामुळे मी घाबरत नाही. फक्त घसा कोरडा पडतोय. खायची इच्छा होत नाही. तेव्हा त्यांना मी जेवण दिले, पाणी दिले, जास्त काही त्यांनी खाल्ले नाही. मग त्यांनी दुधात ड्राय फ्रूट मिक्स करून आणायला सांगा मी ते पिऊन मग औषध घेईल असे म्हंटले. लगेच त्याच्या अक्षयला मी कॉल केला. दूध गरम करून घेऊन ये असे सांगताच थोड्यावेळाने अक्षय दूध घेऊन आला. रंजनाताईने औषध घेतली रिस्पॉन्स व्यवस्तीत होता तिकडे अशोकभाऊ सुद्धा सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहून अपडेट घेत होते. त्यांना आवश्यक असलेल्या मेडिसिन, इंजेक्शन सर्व व्यवस्था अशोकभाऊ यांनी केली होती. दवाखान्यात सुद्धा डॉ. टापरे, डॉ. राहुल खंडारे, व संपूर्ण स्टाफ तितकंच रंजनाताई याना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होता.

मध्यरात्री रंजनाताईची प्रकृती खूप खालावत चालली होती. त्यांना श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होत होता. त्याचा घसा सुद्धा ऑक्सिजनमुळे कोरडा पडला होता. तरी हिंमतीने त्या झुंज देत होत्या. मी मध्यरात्री 1 वाजता पुन्हा त्यांना धीर देण्यासाठी त्याच्या जवळ जाऊन गप्पा करत होतो. तेव्हा ते मला म्हणाल्या पत्रकार भाऊ आमचे अशोकभाऊ सोनोने यांनी लहानपणापासून सर्वांचे खूप काही केले आहे आज ही तेच आहेत त्यांची आम्हाला खूप मदत आहे. मग मी मुद्दाम तेवढ्या रात्री अशोक भाऊ सोनोने यांना कॉल केला वॉर्डातून आणि त्याचे सहज बोलणं करून दिले. तोंडाला ऑक्सिजन लावल्यामुळे त्या तुटक तुटक बोलत होत्या. पण त्यांना समाधान वाटत होतं ते बघून मला बरं वाटलं. विचार केला बहुतेक उद्या या बऱ्या होण्याच्या दृष्टीने प्रवास सुरु करतील आणि मग मी झोपून गेलो. सकाळी उठलो आणि बघतो तर काय रात्री छान बोलत गोष्टी सांगणाऱ्या रंजनाताई अचानक बेडवर शांत पडून आहेत कोणतीच हालचाल करत नाही आहे. आता त्यांना त्रास कमी झाला असेल पण ती माऊली जग सोडून गेली याचं दुःख जास्त होत. कोरोनाच्या अवकाशात उडता उडता ती मृत्यू सोबत लढत होती. पण तरी तीच लक्ष तिच्या मुलांकडे होत. हे मी जवळून बघीतले म्हणून घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी…! आणि रंजनाताई माफ कराल तुमच्या मृत्यूसोबतची झुंड बघणारे आम्ही फक्त हतबल साक्षीदार ठरलो!

पत्रकार #राहुल_पहुरकर,
#COVID19 #corona2020 #CMOMaharashtra #VB

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here