Home Breaking News पक्षभेद बाजूला सावरून समाजाच्या हितासाठी काम करावे- विनायकराव पवार

पक्षभेद बाजूला सावरून समाजाच्या हितासाठी काम करावे- विनायकराव पवार

द रिपब्लिक अपडेट न्यूज नेटवर्क

खामगाव:- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बुलडाणा जिल्हा कार्यकारणी व अमरावती विभागीय कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नुकतेच बुलढाणा येथे मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
बुलढाणा येथील कृष्णा हॉटेल मध्ये शनिवारी 9 एप्रिल रोजी सायंकाळी अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंचावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विभागीय अध्यक्ष कृष्णाजी अंधारे, जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे, यांच्यासह काही नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नुकतीच नियुक्ती झालेले गणेश माने विभागीय कार्याध्यक्ष, सौ अनुजाताई सावळे विभागीय महिला अध्यक्षा, गजानन माने जिल्हा सरचिटणीस, रमाकांत गलांडे जिल्हा संपर्क प्रमुख,
संजय हाडे जिल्हा संघटक,
समाधान सुपेकर जिल्हा उपाध्यक्ष, शैलेश सोले जिल्हा उपाध्यक्ष,वासुदेव कानकिरड जिल्हा उपाध्यक्ष,रविंद्र(बंडू) घाडगे जिल्हा सचिव,
किशोर होगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, किशोर लोखंडे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, गजानन गडाख बुलढाणा तालुका अध्यक्ष यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व छत्रपती श्री शिवराय यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उर्वरित पदाधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी बोलतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव म्हणाले की, अखिल भारतीय मराठा महासंघ ही सर्वात जुनी संघटना असून एक सामाजिक चळवळ आहे. या संघटनेत काम करण्याची संधी मिळणे खूप महत्त्वाचे असून याचा सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजातील उपेक्षित घटकांना फायदा करून द्यावा. संघटनेत असतांना सर्व पक्षभेद बाजूला ठेवून समाजाच्या हिताची कामे करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी कृष्णाजी अंधारे, संजय शिनगारे, अनुजाताई सावळे, गणेश माने यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय मराठा महासंघ युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मनाभ बाहेकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस गजानन माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बुलडाणा शहर अध्यक्ष सचिन परांडे, अरविंद होंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख किशोर होगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.