कौमार्याच्या परिक्षेच भयाण वास्तव..!

 

-राज गवई

 

अहमदनगर जिल्ह्य़ातील हा खेदजनक प्रकार. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील वीशीतली तरुणी. महत्त्वाचे हे की ही मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, यावरुन आपल्याला समजू शकते. या मुलीचा ज्या मुलाशी विवाह झाला त्या मुलाचा अगोदर एक विवाह झालेला होता, तरीही ही मुलगी विवाहास तयार झाली. मुलीच्या घरच्यांनी विवाह थाटामाटात लावून दिला. नंतर वेळ आली कौमार्याच्या परीक्षेची..!
जातपंचायतीच्या साक्षीने कौमार्याच्या परीक्षेचा पास-नापास निकाल लावण्यात आला.


घडलेला प्रकार असा की, जातपंचायतीच्या मंडपाच्या बाजूला एका खोलीत नवविवाहित दाम्पत्यांना पाठवले गेले. त्यांना एक पांढरा कापड देण्यात आला होता. शरीर संबंधानंतर त्या पांढर्‍या कापडावर जर रक्ताचे थेंब दिसले असते तर ही मुलगी कौमार्य परीक्षेत पास झाली असती, दुर्दैवाने असे घडले नाही. विवाहित दाम्पत्य खोलीतून बाहेर पडल्यानंतर मुलाने खोलीत घडलेल्या प्रकाराचे सरेआम जातपंचायतीसमोर वर्णन केले तेही मुलीच्या समोरच..! आता तो मुलगा त्या मुलीला स्विकारायला देखील तयार नाही. पिडीत मुलीने संध्याकाळ पर्यंत नवर्‍या मुलाला वेळ दिलेला आहे. जर तो घ्यायला नाही तर कायदेशीर कारवाई करणार असे सांगितले.

मला वाटत आहे त्या नवर्‍या मुलावर बलात्काराच्या (IPC-376) गुन्ह्याखाली का कारवाई होऊ नये. त्याबरोबरच जातपंचायतीवरही कडक कारवाई व्हायला पाहीजे. यांच्यासारख्यांवर कारवाई खरच होईल का ? की अशा जातपंचायतीतील मुठभरांना हाताशी धरुन राजकीय मंडळी वोटबँक म्हणून उपयोग करण्यासाठी असल्या प्रथा चालूच ठेवणार व लोकांना भ्रमित करुन अंधारातच ठेवणार.
किती ही मानवाच्या मेंदूवरील प्रथा-परंपरेची अधिसत्ता. कुठपर्यंत ही अशीच राहणार ? शासन काही ठोस कायदे करुन त्याची अंमलबजावणी करणार का नाही ?
पुरोगामी पुरोगामी असे राजरोस बोंबलणार्या महाराष्ट्रात आजही हा प्रकार कसा घडतो, किती हा लाजिरवाणा प्रकार ? एकवीसाव्या शतकात हा प्रकार घडतो यावरुन संभ्रम निर्माण होतो की, साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या बाबी कागदावरच आहेत की काय..?